ग्रामायण – नागरिकांना ग्रामस्थांशी जोडणारी चळवळ

सुमारे दोन वर्षांपूर्वी सोशल मिडियावर एका सहलीची बातमी मिळाली. हिवाळा म्हणजे आपल्याकडे सहलींचा हंगाम. या वर्षी कुठे जायचे हा विचार करत असतानाच ही “बातमी” आली. “ग्रामायण”  तर्फे एका दोन दिवसांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पण नेहमी पेक्षा ही सहल खूप वेगळी असणार होती. ती होती ग्रामीण प्रकल्पदर्शन सहल. खेड्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, गोसंवर्धन, महिला व दिव्यांगजनांना रोजगार मिळवून देणारे प्रकल्प, सेंद्रीय शेती, प्लास्टिक मुक्ती, ग्रामीण युवकांसाठी पर्यावरण पूरक आधुनिक शेती व लघु व्यवसायांचे प्रशिक्षण देणारे कार्यक्रम, स्थानिक कलाकारांच्या कलांचे संवर्धन करणारे, त्यांची जोपासना करणारे व त्यांना बाजारपेठ आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणारे प्रकल्प, अशा विविध गोष्टींची शहरातील लोकांना निदान तोंड ओळख व्हावी म्हणून ग्रामायण अशा सहलींचे आयोजन करते अशी माहिती मिळाली.

त्यामुळे ग्रामायण ही संस्था नक्की काय करते असा प्रश्न पडला. त्याचे उत्तरही ग्रामायणच्या संस्थापक कार्यकर्त्यांकडून मिळाले.

“भारताच्या उत्थानासाठी आणि तळागाळातील व खेड्यातील नागरिकांच्या विकासासाठी म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, अशा महान नेत्यांनी प्रयत्न केले. कष्ट उपसले. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन व प.पू. डॉ. हेडगेवार यांचा वैचारिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी  अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात. अशा संस्थांच्या सेवाकार्याची माहिती संबंधितांपर्यंत पोचत नाही. तसेच अनेक नागरिकांना येथील समाजासाठी सेवा आणि साधन रूपाने काही योगदान देण्याची इच्छा असते. अशा लोकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून कामाची संधी मिळाली तर सोन्याला कस्तुरीचा सुगंध!  अशा सर्व लोकांचा परस्पर परिचय करून देण्याचे  व सर्वांशी समन्वय साधण्याचे काम ग्रामायण करते. ग्रामायणचा स्वतःचा कोणताही प्रकल्प नाही. पण अनेक प्रकल्पांना व व्यक्तींना जोडण्याचे काम ग्रामायण करते.”

ग्रामायण बद्दल इतकी माहिती मिळाली आणि मी त्या सहलीत सहभागी झाले. सहल खूपच छान झाली पण इतक्या छान छान प्रकल्पांची माहिती मिळाली तरी आता यापुढे काय हा प्रश्नच पडला होता. त्याचे उत्तरही लगेच मिळाले. ग्रामायणने नागपुरात एक प्रदर्शन आयोजित केले . त्यात खेड्यांमधील विविध संस्था, महिला बचतगट, कलाकार, यांची दालने राहणार होती. तेथे माहिती व विक्री अशी दुहेरी सोय होती. खाद्यपदार्थ विकणारी दालने राहणार होती. त्या निमित्त विविध कार्यक्रम होणार होते. या प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षाही अधिक चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात जी विक्री झाली त्याच्या कितीतरी पट जास्त प्रतिसाद नंतर समाज माध्यमांवरील प्रसिद्धीमुळे  सहभागी संस्थांना मिळाला. मुळात ज्या ग्रामस्थांना आपण अडाणी आणि मागासलेले समजत होतो, ते खऱ्या  अर्थाने किती विकसित व वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आहेत, याचे एक ओझरते दर्शन या प्रदर्शनातून झाले. आणि आता ही परंपरा बनू पहातेय.

या वर्षी ग्रामायण प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे.

दर वर्षी काहीतरी नवीन द्यायचे या विचारातून या वर्षी ग्रामायण ने काही स्पर्धांचे आयोजन करायचे ठरवले आहे.

महिलामंडळांसाठी पर्यावरण संवर्धनात व परिसर स्वच्छतेत महिला मंडळांचा सक्रीय सहभाग हा स्पर्धेचा विषय असून नागपुरातील महिला मंडळांनी गेल्या वर्षी केलेल्या कामांचा फोटोसहीत अहवाल पाठवायचा आहे.

दुसरी स्पर्धा टाकावूतून टिकवू आणि उपयुक्त वस्तू किंवा कलाकृती करायची आहे तर तिसरी स्पर्धा शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक विज्ञान प्रतिकृती (model ) बनवण्याची आहे.

या सर्व स्पर्धा नागपूर महानगर पालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या असून प्रत्येक स्पर्धेसाठी पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांची पारितोषिके तीन ते सहा जानेवारी या काळात होणाऱ्या प्रदर्शनात, मान्यवरांच्या हस्ते दिली जातील. अधिक माहिती ग्रामायण प्रतिष्ठानच्या www.gramayan.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३ जानेवारी ते सहा जानेवारी या काळात होणाऱ्या या प्रदर्शनात १२५ पेक्षा जास्त गाळे (stalls) रहाणार असून अनेक मान्यवर या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. हजारो महिला व पुरुष या प्रदर्शनाला भेट देत असतात. विविध सेवाभावी संस्था, महिला बचत गट, यांना आपले काम लोकांसमोर आणण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. अनेक कंपन्यांचे पदाधिकारी या प्रदर्शनाला भेट देतात. त्यामुळे त्या कंपन्यांच्या C.S.R. फंडातून आपल्या सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत मिळू शकते. गेल्या दोन वर्षात अशी मदत अनेक संस्थांना मिळाली आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने काही कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. अनेक लोकांना  कमी वेळात एकत्र भेटण्याची ही सुसंधी आहे. त्यामुळे हा मणी कांचन योग साधण्यासाठी सर्वांनीच सहकार्य द्यावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे. सगळ्यांचा उदंड प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.

      डॉ.छाया नाईक

       नागपूर

  ९८९०००२२८२