ग्रामायणच्या सेवागाथेतून उमगली मेळघाटची श्रीमंती

मेळघाटची सकारात्मक बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न

  • ग्रामायणच्या सेवागाथेतून उमगली मेळघाटची श्रीमंती
    मेळघाट म्हटले की, कुपोषण बळी आणि मागास आदिवासी समाज अशीच प्रतिमा सामान्यांच्या डोळ्यांपुढे येते. मात्र, मेळघाटची ही ओळख बदलविण्याचे काम संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे. मेळघाटची कलात्मक आणि सांस्कृतिक संपन्नता यातून या भागाची सकारात्मक बाजू समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या लवादा या गावात संपूर्ण बांबू केंद्र या उपक्रमाच्या संचालक डॉ. निरुपमा देशपांडे यांनी व्यक्त केले.
    डॉ. देशपांडे या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्य आहेत. ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवागाथा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांची होळी रंगपंचमी आणि त्यांचे इतर सण आणि परंपरा समजावून दिल्या. डॉ. निरुपमा देशपांडे संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्राम ज्ञानपीठ स्थापन करून, त्यामाध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्य सुरू आहे. फगवा महोत्सव या नावाने एक ग्रामीण बाजार भरविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
    ग्रामीणांच्या भाकरीवर सन्मानाने भाजी मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांबूची राखी बांधायला पाच महिला गेल्या होत्या आणि हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. या महिला महिन्याकाठी ४ ते १० हजार रुपये कमवित आहेत आणि आता सावकारी पाशातून त्या मुक्त झाल्या आहेत. एक वेळ अशी होती की, जेव्हा या महिलांच्या घरातील पाणी भरण्याचे गुंडही सावकाराकडे गहाण असायचे. मात्र, आता बचत गट आणि बांबू केंद्राच्या माध्यमातून हे चित्र पूर्णत: बदलले आहे. आत्मनिर्भर भारताची ही खèया अर्थाने सुरुवात आहे, पायाच आहे, असे मत त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.
    आदिवासी बंधूभगिनींनी तयार केलेल्या वस्तूंना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ही दर्जेदार आणि सुबक उत्पादने जगाच्या कानाकोपèयात पाठवित आहेत. मेळघाटच्या बांबूच्या राख्या ४७ देशांमध्ये निर्यात झाल्या आहेत. बांबूची घरे, स्वच्छतागृह बांधून आदिवासी कुटुंबांची विशेषत: महिलांची विशेष सोय झाली आहे. बांबूच्या स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर करून, परसबाग फुलविण्याचे कौशल्यही या आदिवासी भगिनींनी विकसित केले आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास, हा समुदायही समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतो, हेच यातून स्पष्ट झाल्याचे डॉ. देशपांडे म्हणाल्या. या संवादात्मक कार्यक्रमात, आदिवासी बांधवांनी तयार केलेली काही उत्पादने आणि स्थानिक सणांमधील नृत्य तसेच, निवडक कवितांचे सादरीकरण करून डॉ. देशपांडे यांनी सखोल विश्लेषण केले.

Gram ayan Social Information Centre

Fill up the google form by clicking the link to...